कुठे गेली दिवाळी? / माझ्या आठवणीतली दिवाळी!!!/दिवाळी २०२४/Where did Diwali go? / Diwali in my memories!!!/Diwali 2024
कुठे गेली दिवाळी? / माझ्या आठवणीतली दिवाळी!!!/दिवाळी २०२४
माझ्या आठवणीतली दिवाळी ... !!!
कुठे गेली दिवाळी? / माझ्या आठवणीतली दिवाळी!!!/दिवाळी २०२४ |
.... तरी असेल मी १०-१२ वर्षांचा, माझया लहानपणी मी आजीकडे शिकायला होतो, त्यावेळी फोन मोबाईल्स वगैरे तसं काहीच नव्हतं. फक्त अंतर्देशीय पत्रं / कार्ड असायची. नदीकिनारी छानसे घर होते.
मामांकडे शिकायला असल्यामुळे माझा लाड सगळेच करत होते. म्हणजेच मी अगदी लाडाकोडात तेथे राहायचो. माझा सगळं हट्ट अगदी आनंदाने पुरविला जायचा.
आणि आमचा आठवणीतला सण असायचा तो म्हणजे
दिवाळी!!!. माझ्या आठवणीतली दिवाळी. ...
दिवाळी कशी साजरी केली जायची?
तुमच्या आणि आमच्या जीवनातला सगळ्यात मोठा सण म्हणजे दिवाळी. त्याकाळी म्हणजे मी १०-१२ वर्षांचा असताना दिवाळीचे विशेष महत्व असायचे. तो काळ नव्वदच्या दशकातला होता.
कुठे गेली दिवाळी? / माझ्या आठवणीतली दिवाळी!!!/दिवाळी २०२४ |
तुम्हाला आठवत असेल ना, नारळाचा किस भरून तयार केलेली कारंजी, तांदुळापासून तयार केलेली अनारसे, घरी मुरमुऱ्यापासून तयार केलेला चिवडा, घरीच रवा - सांजा पासून तयार केलेली सांजरी. रव्याचे, मैद्याचे तंदुरुस्त व चवीला खमंग असलेले गावरानी तुपाचे लाडू, चकल्या, शंकरपाळे इत्यादी.
कुठे गेले हो ते सगळे पौष्टीक पदार्थ?
दिवाळीची आम्ही अगदी आतुरतेने वाट पाहायचो. कारणही तसेच होते. माझी मावशी, माझी आई वडील, भाऊ बहीण आणि अगदी जेवढे नातेवाईक असतील तेवढे सगळे गावी जमत असायचो.
मोबाईल्स नसल्यामुळे सतत संपर्क नसायचा जे काही बोलणे असेल ते सर्व पत्रात लेखी स्वरूपात सांगितले जायचे आणि तेही पोचायला ३ ते ४ दिवस लागायचे.
त्यामुळे नातेवाईकांची देखील आतुरतेने वाट पहिली जायची आणि नात्यांची व नातेवाईकांची सुद्धा गोडी राहायची. आमची आजी गावापासून ३ ते चार किलोमीटर वर असलेल्या चौफुली वरून हारून बागवानच्या हॉटेलीवरून घरी संपलेले/खुटलेले पदार्थ मागवायची.
दिवाळी करिता घर स्वच्छ कसे केले जायचे?
दिवाळीच्या काही दिवस अगोदरच सगळी लगबग सुरु व्हायची. जुन्या काळी शहाबादी फरशीचे घर असायचे, त्यामुळे माझी मावशी, आजी, मामी, आणि शेजारच्या १-२ बायका या मिळून सगळ्यात पहिले तर घरातील भांड्यांची धुवून पुसून स्वच्छता करायचे.
कुठे गेली दिवाळी? / माझ्या आठवणीतली दिवाळी!!!/दिवाळी २०२४ |
त्यानंतर, घराची फार्शीला त्याकाळी प्रसिद्ध असलेला वॉशिंग पावडर निर्म्याने दोन ते तीनदा घासून स्वच्छ करून फरची धुतली जायची.
मग मी त्यावेळी काय करायचो मधेच ओतलेल्या पाण्यात उड्या मारून खेळात बसायचो आणि मी लहान असल्यामुळे माझ्याकडे कोणीही जास्त लक्ष द्यायचे नाही. त्या घर स्वस्वच्छतेमध्ये देखील आमच्यासाठी पर्वणी व खूप सारा आनंद असायचा.
दिवाळी करिता सजावट कशी व्हायची?
त्यावेळी आजीचेच घर मोठे होते. घराच्या अवतीभोवती भरपूर जागा असायची.
भरपूर म्हणजे कमीत कमीत सातशे ते आठशे मीटर चारी बाजूला जागा होती, त्यामुळे कोथिंबीर, तांदळाची भाजी, गावरानी कार्ले, गिलके, दोडके, मेथीची भाजी हेअगदी घरचेच असायचे.
बकऱ्या असल्यामुळे दूध देखील घरचेच असायचे. गावरानी कोंबड्या पाळल्यामुळे गावरानी अंडे व मटण घरच्याच कोंबड्यांचे असायचे. आणि जेवण देखील संपूर्ण चुलीवरच तयार केले जायचे.
दिवाळी येण्या अगोदर साधारणतः दोन दिन महिने अगोदर घराच्या मागे व पुढे आजूबाजूला वेगवेळी झेंडूची फुले लावली जायची.
दिवाळीच्या अगदी वेळेवर ती फुले फुलू लागायची, अंगणात झाडूंच्या फुलांचा सतत सुगंध दरवळायचा. मग दिवाळी आली कि ती फुले तोडून प्रत्येक दारावर माळा तसेच, तोरणे घरीच दोऱ्यात ओवून तयार केले जायचे, झेंडूच्या फुलांची कमतरता नसल्यामुळे अगदी संपूर्ण घर हे झेंडूंनी न्हाऊन निघायचे.
दिवाळीच्या दिवशी घरी असलेल्या रिक्षावर देखील झेंडूच्या फुलांची माल घातली जायची.
दिवाळी करिता रोषणाई कशी व्हायची?
रोषणाई करिता आजच्या सारखे विद्युत रोषणाईची साधने त्यावेळी नव्हती. हि गोष्ट आहे नव्वदच्या दशकातील.
दिवाळी आली कि आम्हाला खरेदीचे वेड लागायचे कारण बाजारात प्रत्यक्ष नवीन ड्रेस, नवीन चप्पल फटाकडे, खरेदी करण्यात एक नवीन उत्साह व आनंद असायचा.
आजीच्या घरापासून बाजार अगदी जवळच होता. सर्व नातेवाईक व सर्व लाहान बाळ गोपाळांसोबत आमची आजी किंवा मामा हे आम्हाला बाजारात घेऊन जायचे व तिथून मातीच्या गेरूने लाल केलेल्या पणत्या, बत्तीसे, रांगोळ्या, खडीसाखर, डाळ्या मुरमुरे, फुटाणे, पूजेकरिता लागणारे छोटे मोठे साहित्य खरेदी केले जायचे.
मग संध्याकाळी खरेदी करून घरी आल्यावर, नित्यनेमाने आजी पूजा अर्चा करायची. त्यानंतर ज्या बाजारातून आणलेल्या पणत्या असायच्या त्यांना अगोदर एक दोन तास पाण्यात भिजत घालून नंतर, त्यावर हाताने स्वतः तयार केलेल्या वाती ठेवल्या जायच्या व त्यावर शेंगदाण्याचे तेल टाकून त्या वाती पेटवल्या जायच्या.
त्यानंतर आमची मामी किंवा मामा किंवा स्वतः आजीच एका ताटात त्या पेटत्या पणत्या घेऊन घराच्या सर्व ओटयांवर आणि उकिरड्यावर, आणि छतावर त्या पेटत्या पणत्या ठेऊन पूर्ण रोषणाई केली जायची.
बालगोपाळांचे मनोरंजन कसे व्हायचे?
हे सर्व सोपस्कार आटोपल्यानंर, स्वच्छ व थंड वातावरण असल्यामुळे लवकर काळोख पडायचा म्हणून, संध्याकाळी लवकर, आम्हाला आजी बाबांच्या देखरेखीत किंवा मामाच्या देखरेखीत फटाके फोडायला मिळायची.
त्याकरिता एक पणती अंगणात ठेवलेली असायची, छोटेसे लवंगी फटाके त्यावेळी चौकोनी बॉक्स मध्ये भेटायचे त्याला बारीक दोरी बांधलेली असायची ती सोडून फटाक्यांना स्टील च्या ताटलीत घेऊन मग एक एक करून लवंगी फटाके फोडत होतो आणि त्यानंतर कोठी, सुंसुंद्री, नाग गोळी, रंगीत आगपेटी, इत्यादी देखील जाळायचो.
आमचे मामा त्यावेळी सुतळी बॉम्ब फोडायचे. मी लहान असल्यामुळे सुतळी बॉम्ब ला घाबरत होतो म्हणून दोघे हातांनी कान बंद करून घायचो.
अंगणातील सजावट, आकाशकंदील आणि रांगोळी
दिवाळी आली आणि आकाशकंदील व पणत्या लावल्या नाही असे होऊच शकत नाही.
तर मित्रानो, त्याकाळी म्हणजेच मी लहान असताना, आकाशकंदील हा विकत मिळायचा नाही.
मग माझे मामा बांबूच्या काड्यांनी आणि घोटीव रंगीत कागदाने अगदी सुंदर असा रंगी बेरंगी आकाशकंदील तयार करायचे त्यात मी देखील थोडीशी मदत करू लागायचो. म्हणजे अगदी त्या बांबूच्या काड्या पकडणे, डिंक देणे, दोरी देणे अशी कामे मी करायचो.
पण त्या आकाशकंदिलमध्ये लावण्याकरिता विद्युत रोषणाईचे दिवे नसायचे तर नेहमीप्रमाणे कुंभाराकडून आणलेल्या मातीच्या वातीच्या पणत्या असायच्या.
मिणमिणत्या प्रकाशात आमची छान अशी सुंदर दिवाळी साजरी व्हायची.
रांगोळीची सजावट
अंगणात सजावटीकरिता भव्य अशी रंगीत रांगोळी टाकली जायची.
मित्रानो, तुम्हाला आठवत असेल ना.... त्याकाळी ठिपक्यांच्या रांगोळ्या असायच्या. आणि ते जणू ठिपक्यांशिवाय रांगोळी नाही असे समीकरणच होते.
२०-२० ठिपक्यांची ची रांगोळी, ३०-३० ठिपक्यांची रांगोळी, उडुपी रांगोळी, इत्यादी प्रकारच्या रांगोळ्यांचे प्रकार पाहायला मिळायचे व रांगोळीचे पुस्तके देखील मिळायची. माझी मावशी अंगणात खूप मोठी रांगोळी काढायची आणि त्यात सुंदर असे रंग भरायची आणि रांगोळी तयार झाली कि त्यात देखील एक पणती ठेवायची. ते सगळं पाहत असताना मला फार सुख व आनंद वाटायचा.
बस मग अश्या प्रकारे सर्व कृती पार पाडल्यानंतर, रात्री, मग जेवणाची वेळ व्हायची आमच्या आजी बाबाना आम्ही सगळे प्रेमाने ताई-दादा म्हणत असायचो, तर आमच्या ताई-दादांनी आवाज दिला कि जेवणाची तयारी चालायची जेवणात देखील खमंग गोड-धोड असायचे....
जेवण उरकल्यावर बाहेर, खाटा टाकलेल्याच राहायच्या. आनंदाच्या दिवाळीमुळे सर्व अगदी थकलेले राहायचे. रात्रीचे पणती मधले तेल संपल्यामुळे ती देखील मालवण्याच्या तयारीत असायची.
रात्रीची वीज नसल्यामुळे मी खाटीवर पडल्या पडल्या आकाश अगदी सुंदर व निरभ्र असल्यामुळे चांदणं निहारायचो, आणि सोबतच मामा ऐकत असलेल्या फिलिप्स च्या रेडिओ वर अमीन सयानी यांच्या बिनाका गीतमाला मधील, कभी लिंकिंग रोड, कभी पेडर रोड, हे सलमान खान चे गाणे ऐकता ऐकता, दुसऱ्या सुंदर दिवसाचा अनुभव घेण्यासाठी माझा डोळा कसा लागला होता हे मला देखील कळले नव्हते......
तर, माझ्या प्रिय मित्रानो माझी एके काळची सुंदर अशी दिवाळी मी साजरी केलेली आहे. तशी दिवाळी माझ्या किंवा तुमच्या आयुष्यात नक्कीच परत येऊ शकत नाही.
माझ्या सर्व वाचकांना दिवाळी- २०२४ च्या हार्दिक शुभेच्छा.... शुभ दीपावली. !!!
मित्रानो, तुम्हाला हा माझ्या आठवणीतील दिवाळी लेख आवडला असल्यास नक्कीच अभिप्राय कळवा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please, do not enter any spam link in the comment box