#Soneri Kombdya #Golden Hens #सोनेरी कोंबड्या
सोनेरी कोंबड्या
(आमचे प्रिय, बापू मामा यांच्या आठवणीतून...)
असेल साधारण ३५-४० वर्षांपूर्वीची गोष्ट, मी खूप लहान होतो, आमचे आजी आणि बाबा हे त्यावेळी टोपलीमध्ये फळे विकण्याचे काम करायचे. त्याकरिता त्यांना पहाटे उठून मार्केट मध्ये जाऊन फळे विकत घ्यावी लागायची. मी लहान असल्यामुळे मला मार्केट काय असते, फळे कशी विकत घेतात, बाजारात गर्दी असते ते सगळं पाहायची मनापासून खूप उत्सुकता होती.
आजीकडे तसे वातावरण छान होते जसे गावात असते ना अगदी तसेच. म्हणजे आजीने कोंबड्या पाळलेल्या होत्या, बकऱ्या पाळलेल्या होत्या, आणि एक खंड्या नावाचा कुत्रा पण होता. मला माहीत नाही पण मी जेवायला बसलो कि तो कुठे का असेना आपोआप येऊन जायचा त्याला आपोआपच समजायचे कि, मी जेवत आहे मग तो पळत पळत यायचा आणि त्याची इवलीशी शेपूट हलवून जणू माझ्याकडे भाकर मागायचा. आजीच्या हातची बाजरीची भाकरी आणि मिरचीचा ठेचा माझा आवडीचा होता.
एके दिवशी, मी सकाळी सकाळी न्याहारी केली आणि मला बाजार पाहायचा होता म्हणून आजी आणि बाबांसोबत बाजारात जायचे ठरवले. मग बाजाराच्या दिवशी आजी आणि बाबांनी सोबत सात आठ गावरानी कोंबड्या विकण्याकरिता घेतल्या. मग मी पण होतोच सोबतीला आम्ही तिघेही पायीच निघालो आणि बाजाराच्या एका कोपऱ्याला जिथे कोंबड्या विकणारे उभे होते तिथे आम्हीपण उभे राहिलो. शेजारचीच फक्त एकच कोंबडी घेऊन एक जोडपं उभं होत. पण त्या जोडप्यासोबत आणलेली ती कोंबडी फारच चमकदार दिसत होती.
तिचे पिसे पण चमकदार होते. मला ती कोंबडी फार आवडल्यामुळे मी आजी आणि बाबांना न विचारता त्यांनाच विचारले, "आमच्या ह्या दोन कोंबड्या घ्या आणि तुमची ती चमकदार सोनेरी कोंबडी आम्हाला द्या." त्यावर ते उत्तरले, कि तुमच्या सगळ्या कोंबड्या जरी दिल्यात तरी हि कोंबडी देणार नाही असे बोलून ते माझ्याकडे एकटक पाहायला लागले. मला या गोष्टींचे आश्चर्य वाटत होते. परंतु या गोष्टींचे उत्तर मला कोणीच दिलेले नव्हते. तेवढ्यात तिथे एक कोंबडी घेणारा ग्राहक आला आणि त्यांनी ती कोंबडी चक्क त्यावेळी सातशे रुपयांना विकली.
मग खूप वर्ष उलटलीत मी तो विषय विसरलो होतो पण अचानक हातात एक पुस्तक आले आणि मला गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आठवली आणि उत्तरही मिळाले.
(पूर्वार्ध)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please, do not enter any spam link in the comment box